4k समाचार दि. 6
कामोठे (वार्ताहर) : बीड आणि शेवगाव परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने मदत साहित्याचे वाटप करण्यात आले.

पूरग्रस्त भागांतील कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून मंडळातील सर्व सदस्य व महिला भगिनींनी दोन दिवस अथक परिश्रम घेऊन आवश्यक शिधा व वस्तू जमा केल्या. एक टेम्पो बीड येथे आणि दुसरा टेम्पो शेवगाव येथे नेऊन मदतीचा हा सर्व साहित्यसाठा प्रत्यक्ष गरजवंत कुटुंबांना वाटप करण्यात आला.

या उपक्रमात मंडळाचे संस्थापक पोपटशेट आवारी, सुरेशशेठ धवन, आत्मारामशेठ आरोटे आणि बाबाजीशेठ ढोमे यांचे विशेष योगदान राहिले. मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या भगिनींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या शिधावाटप मोहिमेमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला असून समाजातील एकोपा आणि संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे.
