नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन



तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
4kNews कामोठे
मुंबई, दि. ३ ऑगस्ट २०२६ : चीन सरकारने तिबेटी जनतेवर लागू केलेल्या नव्या “जातीय एकात्मता धोरणा” (Ethnic Unity Policy) विरोधात २ आणि ३ ऑगस्ट रोजी मुंबईत तिबेटी बांधव आणि भारतीय समर्थकांनी मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन केले. या धोरणाद्वारे तिबेटी भाषा, संस्कृती, धार्मिक परंपरा आणि स्वतंत्र राष्ट्रीय ओळख मुख्य प्रवाहातील चीनी संस्कृतीत विलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.



वक्त्यांनी सांगितले की, चीन सरकारच्या या धोरणामुळे तिबेटी मुलांच्या शिक्षणात मातृभाषेचे स्थान कमी होत असून मँडरिन भाषेचा वापर सक्तीने वाढविला जात आहे. तसेच तिबेटी बौद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक संस्थांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. या धोरणाचे परिणाम केवळ तिबेटी समाजापुरते मर्यादित नसून उईघूर, मंगोलियन, हुई आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या भाषा, संस्कृती आणि ओळखीवरही होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.



तिबेटन यूथ काँग्रेस यांच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात मार्गदर्शन सभा, निषेध आंदोलन तसेच भारतरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे कार्यक्रम घेण्यात आले.
दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सर्व तिबेटी बांधव व भारतीय समर्थक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथे एकत्र जमले. राजगृहाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण चैत्यभूमी येथे गेले. तेथे तिबेटवरील चीनी आक्रमण, तिबेटी जनतेची सद्यस्थिती आणि नव्या जातीय एकात्मता धोरणाचे परिणाम याविषयी तेनझिन त्सुंडू, लोबसांग आणि इंद्रजीत मोहिते यांनी सविस्तर माहिती दिली.



यानंतर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. चैत्यभूमी स्मारकाच्या वतीने मा. दर्शना भीमराव आंबेडकर यांनी तिबेटी प्रतिनिधींचे स्वागत केले.
यावेळी तिबेटी प्रतिनिधींनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे त्यांना भारतात सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता येत आहे. तसेच बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी तिबेटी समाजात विशेष आदरभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.



दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदान येथे ३०० हून अधिक तिबेटी बांधवांनी चीन सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान नव्या जातीय एकात्मता धोरणाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. तसेच काही कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून मुंडन करून आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनानंतर झालेल्या मार्गदर्शन सभेत इंद्रजीत मोहिते यांनी तिबेटचे स्वातंत्र्य, तिबेटी जनतेचे सांस्कृतिक अस्तित्व आणि हिमालयीन सीमाभागातील स्थैर्य हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी मुंबईमध्ये निर्वासित तिबेटी समाजासाठी “तिबेट हाऊस” स्थापन करण्याची मागणी केली.



यावेळी तिबेटी नेत्यांनी गेल्या वीस वर्षांपासून तिबेटी जनतेच्या हक्कांसाठी, सांस्कृतिक संरक्षणासाठी आणि तिबेट प्रश्नावरील जनजागृतीसाठी इंद्रजीत मोहिते यांनी केलेल्या कार्याचा विशेष गौरव केला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी इतर अनेक मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी नरिमन पॉइंट येथील चीनी वाणिज्य दूतावास परिसरात जाऊन चीन सरकारच्या धोरणांविरोधात आपला निषेध नोंदविला.



या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेनझिन त्सुंडू, लोबसांग, मेथोक, मिगमार, मयूर शिर्के, मयुरी मोहिते तसेच इंद्रजीत मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.
तिबेटी जनतेची भाषा, संस्कृती, धर्म आणि स्वतंत्र राष्ट्रीय ओळख जपण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. कोणत्याही समुदायाचे सक्तीने सांस्कृतिक एकसंधीकरण करण्याचे प्रयत्न मानवाधिकारांच्या मूलभूत तत्त्वांविरोधात आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top