4kNews कामोठे
पनवेल, दि. 12 (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्यालगतची फुले व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरावे लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले

फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातील जागा, कर्नाळा सर्कलजवळील जागा, लाईन आळी रोडवरील विलास कोठारी यांच्या जागेतील परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील डी.एड. कॉलेजसमोरील मोकळी जागा वाहनतळासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, काही जागांची अद्याप स्वच्छता झालेली नसल्याने वाहनतळ प्रत्यक्षात कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
गर्दीनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग व बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापाऱ्यांना माल चढ-उतारासाठी दुपारी १ ते ४ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.

प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध
उरण नाका ते टपाल नाका मार्गावर रिक्षा व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून वाहतूक उरण नाका–पंचरत्न सर्कलमार्गे वळविण्यात येणार आहे. फुल मार्केट ते पोलीस चौकी–पटेल हॉस्पिटल तसेच कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. फुल व पालेभाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी व सात अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी पनवेल महापालिकेकडे अतिरिक्त ५० वॉर्डनची मागणी केली आहे.

“गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निश्चित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करून वाहतूक नियमांचे पालन करावे,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी केले.
दरम्यान, ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, पराग मोहिते, प्रसाद सोनावणे, अभिजीत साखरे, शैलेश जगनाडे, जय कुष्टे, धिरज निंबाळकर, सिद्धेश पवार व कौस्तुभ सोमण यांनी वाहतूक शाखेचे वपोनि सुभाष पुजारी यांच्यासोबत विविध ठिकाणी पाहणी करून वाहतूक नियोजनाबाबत चर्चा केली.

