पनवेल 4kNews विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजय चौकार मारला आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील यांना एक दोन नव्हे तर तीनदा पराभूत केले आहे. लालबावट्याचा गड उध्वस्त करणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने सलग चौथ्यांदा पनवेलकरांनी कल दिला आहे. अपप्रचारातून विरोधकांनी मोठी फिल्डिंग लावली असली तरी त्यांनी विजयाचा स्ट्रेट ड्राइव्ह मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

त्यांच्या अभिनंदनासाठी २३ नोव्हेंबर पासून निवासस्थानी आणि कार्यालयामध्ये सकाळपासून नागरिक कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर इतरांनी अक्षरशः गर्दी केली आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमत आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबरच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनाही भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी लोकसमुदाय दिसून येत आहे.

पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूर कुटुंबीय सक्रिय आहे. सर्वांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्याचमुळे गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पाठी असलेला जनमत हे सर्व ज्ञात आहे.
