पनवेल, दि.5 (4kNews) ः उभ्या गाडीला टकटक करून गाडीवरील चालकास जमिनीवर काहीतरी पडल्याचे सांगून सदर चालक गाडी बाहेर उतरले असताना संगनमताने गाडीतील मौल्यवान वस्तू पळविणार्या टोळीतील एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रशांत पिंगळे हे त्यांच्या महिंद्रा कंपनीच्या गाडीतून मिटींगसाठी गार्डन हॉटेल परिसरात आले असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागील सिटवर रोख रक्कम असलेली बॅग ठेवली होती. व गाडीवरील चालक गाडीतच बसला होता. दरम्यान आरोपी शनमुगम अमरनाथन (38) व त्याच्या इतर तीन साथीदारांनी गाडी चालकाला खिडकीच्या काचेला टकटक करून जमिनीवर काहीतरी पडल्याचा इशारा केला असता सदर चालक हा गाडीबाहेर उतरुन गाडीच्या बाहेर पाहत असताना हे आरोपी गाडीतील ब्राऊन रंगाच्या बॅगेसह पसार झाले होते. अशाच प्रकारची अजून एक घटना पनवेल शहर परिसरात घडली होती.

याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, अमोल डोईफोडे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पो.ना.विनोद देशमुख, पो.शि.चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने सदर आरोपी पैकी शनमुगम अमरनाथन याला ठाणे जिल्हा परिसरातून ताब्यात घेतले आहे. तर त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत. या टोळीवर या पूर्वी सुद्धा नालासोपारा, शिवाजी पार्क मुंबई, पार्क साईड पोलीस ठाणे, घाटकोपर पोलीस ठाणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
