पनवेल, दि.14 (4kNews) ः नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली असून पनवेल परिसरातील अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स आणि ग्रामीण भागातील फार्महाऊसच्या बुकिंग सुरू आहेत. यासाठी मुंबईसह अनेक शहरातील पर्यटक बुकिंग करत आहेत. यावर्षी 31 डिसेंबर मंगळवारी आहे. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे वार धरून किमान चार दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करता येणार आहे.

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस उभारण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक पद्धतीचे व ग्राहकांना आवश्यक असणारे साधनसामुग्रीसह रिसॉर्ट सज्ज आहेत. तसेच येथील विविध पद्धतीने नटलेल्या हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था व्हावी याकरिता हॉटेलची बुकिंग सुरू करण्यात आली आहेत. पनवेल परिसरात गेल्या काही वर्षांत उत्तम व्यवस्था असणारे हॉटेल तयार झाले आहेत.

यात वातानुकूलित खोल्या,पोहण्यासाठी तलाव आधीसह स्थानिक पदार्थ आणि मासळीच्या पदार्थांची रेलचेल असणार आहे. यातील अनेक हॉटेलची बुकिंग ही मुंबईतून केली जात आहे. हॉटेल्स मध्ये वातानुकूलित खोलीसाठी 5 हजार तर काही ठिकाणी विनावातानुकूलित खोलीसाठी 3 हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे यंदा नववर्षाचे स्वागत पनवेल परिसरात जल्लोषात होण्याची चिन्हे आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील व ग्रामीण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या फार्म हाऊसना ही पसंती दिली जात आहे. त्यामध्ये पनवेल परिसरात असलेले कर्नाळा अभयारण्य, उसर्ली बुद्रुक, नेरे परिसर, चिंचवण, शिरढोण, मालडुंगे आदींसह धरण परिसरात असलेल्या फार्म हाऊसची बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच झालेली आहे. यात कुटुंब तसेच ग्रुपसाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी पाच ते दहा हजार रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती राज रिसॉर्टचे मालक संतोष उरणकर यांनी दिली आहे.
