
पनवेल – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे येत्या शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिकरित्या प्रवेश करणार आहेत. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान (प्लॉट नं. ६, सेक्टर १२, खारकोपर रेल्वे स्टेशनसमोर) येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.


या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पर्यावरण मंत्री गणेश नाईक, गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, पंडितशेठ पाटील, सुरेश लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पक्षप्रवेश प्रसंगी जे. एम. म्हात्रे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, तसेच सरपंच–उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्तेही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
पनवेल आणि परिसरातील राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जे. एम. म्हात्रे हे या भागातील वजनदार नेते मानले जातात आणि त्यांचा भाजप प्रवेश स्थानिक राजकारणात नवी दिशा देणारा ठरू शकतो.
