4k समाचार दि. 12 पनवेल वार्ताहर (संजय कदम)
श्रावण महिन्यातील मंगळवार म्हटलं की महिलांसाठी आनंदाचा सोहळा—मंगळागौर! महाराष्ट्रातील हा पारंपारिक सण नवविवाहित महिलांसाठी खास असून, देवी गौरीच्या पूजेद्वारे वैवाहिक सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. याच सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय व जूनिअर कॉलेज आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

१२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित या अनोख्या उपक्रमात विद्यालयातील माता पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. झिम्मा, फुगडी, उखाणे अशा पारंपारिक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती रंगतदार पद्धतीने सादर झाली. प्रत्येक गटाने भिन्न व संदेशपूर्ण नाव घेत सादरीकरण केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम पाटील, कार्याध्यक्षा राजश्री पाटील, शेकाप कामोठे महिला आघाडी अध्यक्षा उषा झणझणे, शिव व्याख्यात्या सुवर्णा वाळुंज आणि विद्यालयाचे चेअरमन शंकर म्हात्रे उपस्थित होते. मुख्याध्यापक अनिल भगत यांनी पालकांच्या सहभागाचे कौतुक केले.

सुजाता पाटील आणि मनीषा पयेर यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. पारंपारिक गाणी, उखाणे आणि खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला सलाम करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
