4k समाचार
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)गेली ५ ते ६ दिवस रायगड जिल्यातील उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे उरण तालुक्यात असलेल्या मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भवानी गंगा नावाची मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षिततेसाठी मोरा बंदरात नांगर टाकून विसावली होती.
१९ ऑगस्ट २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटींवर ६ खलाशी व एक तांडेल असे एकूण सात जण होते.पैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचालयाला गेला होता.बराच वेळ झाला तरी बोटीवर दिसून आला नसल्याने त्याचा शोध घेतला मात्र कुठेच आढळून आला नाही.त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती वपोनि सुर्यकांत कांबळे यांनी दिली.

दरम्यान याप्रकरणी पोलिस व सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच गुजराती बोटीवरील खलाशी व तांडेल यांनाही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी दिली.वारंवार मासेमारी बोट, प्रवाशी बोटीच्या दुर्घटना होत असल्यामुळे समुद्रातील प्रवास व व्यवहार अधिकच धोक्याचे झाल्याचे चित्र दिसत आहे.
