4k समाचर दि. 1
पनवेल (प्रतिनिधी) नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज (शनिवारी) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी शेकापच्या व्यासपीठावरून आणि आपल्या भाषणातून गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली.

राजेंद्र पाटील यांनी केलेल्या या गंभीर वक्तव्यामुळे गणेश कडू यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या जीवितास झालेल्या धोक्यामुळे गणेश कडू यांनी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्यांनी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, माजी नगरसेवक सुनिल बहिरा, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, संतोष पाटील, माजी नगरसेवक नीता माळी आदी उपस्थित होते.

शेकापच्या कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी बेताल वक्तव्य करत खालच्या भाषेत टीका केली होती आणि त्यामध्ये गणेश कडू यांना टार्गेट करत अक्षरश मारण्याची धमकी उघडपणे दिली. या संदर्भात गणेश कडू यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गणेश कडू यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले कि, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे व माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मी दोन महिन्यापुर्वी शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातील काही लोक माझ्या विरुद्ध राग ठेवुन आहेत. दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये एका कार्यक्रमात राजेंद्र महादेव पाटील (रा. वहाळ) याने सार्वजनिक भाषण करतांना माझा नाम उल्लेख करत थेट मारण्याची धमकी दिली. “गणेश कडू दात दाखवत होता, “या निमीत्ताने मी गणेश कडू ला सांगु इच्छीतो. तुझे दात घशात घालण्याइतकी ताकद माझ्या मनगटात आहे. तुला शेवटचा आणि पहिला अंतिम शब्द, परत जर तू दात दाखवलेस तर तुला तिथे येऊन फटकावेल, तुला सोडणार नाही.” अशा गुंडगिरी शब्दात मारण्याची धमकी राजेंद्र पाटील याने मला दिलेली आहे. राजेंद्र पाटील हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे,

त्याच्याकडून माझ्या जिवीतास धोका आहे. तो मला ठार मारण्याचा प्रयत्न करु शकतो आणि ही बाब राजेंद्र पाटील याने केलेल्या भाषणावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे नम्र विनंती आहे की, राजेंद्र महादेव पाटील रा. वहाळ, ता. पनवेल याचे विरुद्ध मला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत कायदेशिर कारवाई करण्यात यावी, असे गणेश कडू यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे. राजेंद्र पाटील हे सतत धमकी देण्याच्या विधानाने आणि गुन्ह्याने चर्चेत असतात अशातच गणेश कडू यांना दिलेली जाहीर धमकी गुंड प्रवृत्तीची असल्याने त्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता पुढे कोणती कार्यवाही करते याकडे सर्वसामान्य माणसाचेही लक्ष लागले आहे.
