4k समाचार
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
मौजे कुंभिवली तालुका पनवेल येथील सर्वे नंबर ५४/२ क्षेत्र ०.५८.६० हे.आर. ही जमीन मिळकत आदिवासी खातेदार राघो नारायण वीर यांचे नावे सात बारा सदरी आणि प्रत्यक्ष ताबे कब्जात होती. सन २०१२ मध्ये तत्कालीन तलाठी सुनील बांगर ( सध्या विश्वनिकेतन कॉलेजचे विश्वस्थ) यांनी तत्कालीन पोलिस पाटील हरी दामोदर वीर हा आदिवासी व्यक्ती बरोबर संगनमत करून सदर जमीन अवैधरित्या हस्तांतरित केली होती. आदिवासी कुटुंब १२ वर्ष लढत होते परंतु त्यांना कोणीही योग्य मार्गदर्शक मिळत न्हवता. उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्ष कोर्टात केस लढून ॲड राजेंद्र मढवी यांनी सदर जमीन आदिवासी कुटुंबास मिळवून दिली. परंतु विश्वनिकेतन कॉलेज ने हरी दामोदर वीर याला पुढे करून मुंबई महसूल न्यायाधिकरण मुंबई येथे अपील अर्ज करून स्थगिती आदेश मिळविला होता. त्यामुळे आदिवासी कुटुंबाला १००% न्याय मिळत न्हवता.

ही विषयासंदर्भात खालापूर पोलिस स्टेशन मध्ये अत्रोसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा ह्याकरता एक वर्ष पाठ पुरावा सुरू होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यात आला न्हवता. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असे उप विभागीय पोलिस अधीक्षक खालापूर डॉ विशाल नेहूल यांनि काही दिवसांपूर्वीच उप विभागीय पोलिस अधीक्षक खालापूर ह्या पदाचा पदभार स्वीकारताच ही केस संवेदनशील पणे हाताळली, कारण त्यांचा कायद्याचा खोलवर अभ्यास आणि यापूर्वी अशाच एका प्रकरणात त्यांनी गुन्हा दाखल केला असल्याने त्यांना पूर्ण कल्पना होती.

त्यांनी संबंधित व्यक्तींना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून योग्य ती समज दिल्यावर विश्वनिकेतन कॉलेज ने आदिवासी कुटुंबाशी चर्चा करून तडजोड करण्याचे मान्य केले आणि महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई येथील अपील अर्ज मागे घेतला. त्यामुळे आदिवासी कुटुंबाला त्यांची जमीन १००% परत मिळाली असून , हा न्याय मिळवून देण्यामध्ये उप विभागीय पोलिस अधीक्षक डॉ विशाल नेहूल यांची भूमिका सर्वात महत्वाची ठरली.द्वारका लहू वारगुडे यांनी व त्यांच्या कुटुंबाने डॉ विशाल नेहूल, उरण सामाजिक संस्थेचे ॲड राजेंद्र मढवी, पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उप निरीक्षक संतोष अवटी यांचे आभार मानले आहेत.
