4k समाचार
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा (भाप्रसे) यांचे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील हजारो सफाई कामगारांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी संचालक कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देणे बाबत चर्चा झाल्यानंतर वारसा हक्काने नियुक्ती करणे बाबत दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी आगदी दुसऱ्याच दिवशी आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित झाले आहे.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपालीका प्रशासन संचालनालय येथे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला होता त्याअनुषंगाने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा, नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली त्यापैकी एक सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाहक्काने नियुक्ती बाबतही चर्चा करण्यात आली होती कारण महाराष्ट्रातल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.२४/२/२०२३ रोजी आदेश काढला होता परंतु उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक ३२०४/२३ ने स्थगिती दिल्याने गेल्या दोन ते तीन वर्षापासून वारसा हक्काने नियुक्ती थांबल्या होत्या परंतु संघर्ष समितीच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठ येथे संघर्ष समितीचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अँड सुरेश ठाकूर, मुख्य संघटक संतोष पवार, अनिल जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठ येथे चालू असलेल्या रिट याचिके मध्ये प्रत्येक तारखेला उपस्थित राहून सरकारतर्फे सिनियर कौन्सिल ॲड विजयकुमार सकपाळ व विविध कर्मचारी संघटनांमार्फत योग्य म्हणणे सादर करून या बाबतचा पाठपुरावा करण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले.

मा. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दि. ८ जानेवारी २०२५ स्थगिती आदेश उठवून महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती करण्याबाबतचा मार्ग सुकर केला होता. यावर शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक २८/१/२०२५ रोजी नियुक्ती करण्याबाबत आदेश काढला होता. परंतु आजही अनेक नगरपालिकेमध्ये औरंगाबाद खंडपीठ यांनी स्थगिती आदेश उठवून ही तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुस्पष्ट आदेश काढलेले असतानाही बहुतांश नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील मुख्याधिकारी यांच्या कडून वरिष्ठ स्तरावर अभिप्राय मागविण्यात येत होते आणि अभिप्राय न मिळाल्याने प्रकरणे गेले वर्षभर प्रलंबीत ठेवण्यात आली होती त्यामुळे राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांचे न भरुन निघणारे नुकसान होत होते या बाबींचा गांभीर्याने विचार करून सफाई कर्मचाऱ्यांना वारसांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकारी समवेत दि. ९/९/२०२५ रोजी सविस्तर चर्चा करत असताना राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी अनेक नगरपालिकांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती दिली नसल्याबाबतची बाब यावेळी आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा या संवेदनशील अधिकारी म्हणून नाव लौकीक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती देताना महाराष्ट्रातील जवळजवळ १०० पेक्षा अधिक नगरपालिकांनी संचालनालयाकडे मार्गदर्शन मागवले होते व त्यामुळे नियुक्ती देण्यास विलंब केला जात होता याची दखल घेत आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती करणे बाबत त्वरित दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी आदेश काढले असून आदेश काढूनही सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती न दिल्यास संबंधित मुख्याधिकारी यांना व्यक्तिशः जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे सुस्पष्ट नमूद केले आहे. आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी या घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्वरित नियुक्ती मिळणार आहेत त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा आणि संघर्ष समितीचे सर्व नेते डॉ डि एल कराड, ॲड सुरेश ठाकूर, रामेश्वर वाघमारे, रामगोपाल मिश्रा, ॲड सुनील वाळूंजकर, श्रावण जावळे, अनिल जाधव, अनिल पवार , आण्णा पाटील, सक्रिय पाठिंबा देणारे संवर्ग कर्मचारी संघटनेचे कैलास चव्हाण, आणि या संघर्ष समितीचे मुख्य संघटक संतोष पवार आणि सर्व लढाऊ कामगार प्रतिनिधीं जितेंद्र विचारे, सचिन रसाळकर, भूषण काबाडी, सुभाष कदम, केशव बुजवणे, देवा, शशिकांत मोरे, सुभाष जाधव यांचे अभिनंदन राज्यातील हजारो सफाई कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे.
