4kNews कामोठे दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) गव्हाण गावातील अंगणवाडी क्रमांक १, २, ३ व ४ यांच्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेमुळे या अंगणवाड्यांना जागेसह नवीन इमारती बांधून देण्याची मागणी पनवेल पंचायत समिती सदस्या जिज्ञासा किशोर कोळी यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले असून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनाही त्याची प्रत सादर करण्यात आली आहे.

जिज्ञासा कोळी यांनी निवेदनात म्हंटले आहे की, गव्हाण गावातील अंगणवाडी क्रमांक १, २, ३ व ४ या इमारती अत्यंत नादुरुस्त झाल्या असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंगणवाडी क्रमांक १ व २ समोरील अनधिकृत बांधकामावर सिडकोने १० जून २०२५ रोजी कारवाई केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निकृष्ट करण्यात आलेल्या बांधकामाचे काही अवशेष अंगणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसून आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याचा परिणाम अंगणवाडीच्या पटसंख्येवरही झाल्याचे जिज्ञासा कोळी यांनी निवेदनात केले. याशिवाय अंगणवाडीलगत असलेल्या अनधिकृत इमारतीवर २५ मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान इमारतीचे काही भाग अंगणवाडीच्या पत्र्यावर पडल्याने पत्रे फुटली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अंगणवाडीत पावसाचे पाणी गळण्याची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.या पार्श्वभूमीवर सिडकोच्या अभियंत्यांकडून तात्काळ पाहणी करून गव्हाण गावातील अंगणवाडी क्रमांक १, २, ३ व ४ साठी सिडको विकास निधीतून जागेसह नवीन इमारती उभारण्यात याव्यात, अशी मागणी जिज्ञासा कोळी यांनी केली आहे. दरम्यान, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

