4kNews कामोठे
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी संवेदनशील भागांत ‘एरिया डॉमिनेशन’
पनवेल, दि. 9 (वार्ताहर) : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिस व राज्य राखीव दलाच्या (RAF) जवानांनी विविध संवेदनशील भागांत रूट मार्च व ‘एरिया डॉमिनेशन’ केले.

पनवेल शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला मार्च ५२ बंगला, साईनगर, बंदर रोड, एम.जी. रोड, कच्ची मोहल्ला, मुसलमान नाका, पाडा मोहल्ला, जलालशहा दर्गा, महानगरपालिका कार्यालय, जय भारत नाका, लाईन आळी, वीरुपक्ष मंदिर, आदर्श हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त झाला.

या मोहिमेत पनवेल शहर पोलिसांचे ७ अधिकारी व ३५ अंमलदार, तसेच आरएएफ बी-१०२ चे उपकमांडर, सहाय्यक कमांडर, ५ निरीक्षक, ८ उपनिरीक्षक व १०१ अंमलदार सहभागी झाले. पोलिसांची दोन आणि आरएएफची तीन वाहनेही सहभागी होती.
संवेदनशील भागांत पोलिसांची उपस्थिती वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वपोनि बाळा कुंभार यांनी केले.

