4kNews कामोठे
उरण, दि. 9(विठ्ठल ममताबादे) : विंधणे कोळीवाडा येथे ‘एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, विंधणे’ या संस्थेचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ६) कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडला.

स्थानिक पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारंपरिक मच्छीमार बचाव व सामाजिक कृती समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभ्यासक रमेश भास्कर कोळी होते. त्यांनी मच्छीमार बांधवांना मार्गदर्शन करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिघोडे कांदळवन समितीचे अध्यक्ष व पारंपरिक मच्छीमार संस्थेचे सचिव प्रितेश काशिनाथ कोळी यांनी प्रास्ताविकातून संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली.

यावेळी गव्हाण सहकारी संस्थेचे चेअरमन हितेश कोळी यांनी मच्छीमारांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच परिसरातील विविध मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य प्रवर्तक व चेअरमन सुनील बाळाराम कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या स्थापनेमुळे विंधणे कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

