4kNews कामोठे दि. 12
पनवेल : सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या वतीने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मराठा भवन येथे समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत समाजासमोरील विविध प्रश्नांसह सिडकोकडून प्राप्त झालेल्या तोडक कारवाईच्या नोटिसांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सिडकोच्या नोटिसांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समाजबांधवांनी घाबरून न जाता कायदेशीर व प्रशासकीय मार्गाने एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय पाठपुराव्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुंबईतील मागील मराठा आंदोलनादरम्यान कायदेशीर प्रक्रिया सांभाळणारे ॲड. आशिष राजे गायकवाड यांनी उपस्थितांना कायदेशीर मार्गदर्शन केले. सिडकोच्या नोटिसांबाबत उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘मुंबई थ्री झिरो – मुंबई वारी’च्या पार्श्वभूमीवर खांदा कॉलनीतील समाजबांधवांचा सहभाग व नियोजनाबाबतही चर्चा झाली. समाजाच्या प्रश्नांसाठी शांततामय, कायदेशीर व लोकशाही मार्गाने एकजुटीने लढा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. बैठकीस मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

