4kNews कामोठे दि. 23
कायद्याच्या शिक्षणासोबत नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे मान्यवरांचे आवाहन
पनवेल (प्रतिनिधी) : सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉ, पनवेल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १७ ऑक्टोबर रोजी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची कार्यपद्धती, कायद्याच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि शैक्षणिक प्रवासाची दिशा यांची ओळख करून देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गणेश पूजनाने झाली. प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिस्त, परीक्षा पद्धती आणि कायद्याच्या अभ्यासासोबत व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल न्यायालयातील अधिवक्ता, लेखापरीक्षक व कायदेशीर सल्लागार ॲड. भूषण म्हात्रे उपस्थित होते. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे राष्ट्रीय प्रमुख व दक्षता अधिकारी बन्सी लाल भारद्वाज, वरिष्ठ पत्रकार व विशेष कार्यकारी अधिकारी संजय कदम आणि कायदेशीर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोहर सचदेव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांनी कायद्याच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी, व्यावसायिक शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक अनुभव, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन आणि कायद्याच्या क्षेत्रातील भविष्यातील संधींची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक प्रवासाबद्दल उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

