पनवेल (प्रतिनिधी)4kNews पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) झाले.

विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेचकीने नेम धरणे, लगोरी, दोरी उड्या, लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पांढरे, संजय चौधरी, सीताराम मोहिते, विश्वास काथारा, स्वप्नील ठाकूर, विस्तारक अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि तालुक्यातून आलेले खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेसाठी विश्वास काथारा यांच्याकडून विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळातही प्राविण्य मिळवले पाहिजे आणि आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव मोठे केले पाहिजे, असे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
