4k समाचार
उरण दि २5(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी यंदा दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. १० ऑगस्ट २०२५ रोजी यात्रा सुरु झाली. अतिशय खडतर असणारी कैलास मानसरोवर यात्रा गुरुवारी (ता. २१) त्यांनी पूर्ण केली. हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजली जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा पूर्ण करणाऱ्याला ‘कैलाशी’ असे संबोधले जाते. ही यात्रा अंतिम यात्रा म्हणून समजली जाते. त्यामुळे यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये सपत्निक ही यात्रा पूर्ण केली होती. मात्र ‘डोकलाम’ मुद्यावरून २०१८ पासून कैलास मानसरोवर यात्रा बंद होती, परंतु यंदा जूनमध्ये कैलास मानसरोवर यात्रेला परवानगी मिळाल्यानंतर तातडीने ही संधी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा साधली.

कैलास मानसरोवर यात्रेत तीन दिवसांच्या अतिशय खडतर अशा कैलाश परिक्रमेचा समावेश होता. दारचिन येथून पहाटे पाच वाजता परिक्रमेला सुरुवात केली आणि यमद्वाराला तीन फेऱ्या मारून कैलाश मानसरोवर परिक्रमेला प्रारंभ केला. त्यानंतर सुंदर नद्या, उंचच उंच बर्फाळ पर्वत, ऊन-पावसाचा खेळ सोसत पहिल्या दिवसाचा १४ किमीचा प्रवास त्यांनी बर्फातून झाला. दक्षिण भागाचे हे दर्शन विलोभनीय होते. देरापूक उत्तरमुखाचे सुंदर दर्शन घेतल्यावर प्रवासाचा ताण कमी झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गौरीकुंडाचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. नंदीच्या आकाराचे ते पर्वत पाहून स्वर्गसुखाचा अनुभव आला. त्यानंतर दुसरा दिवस २२ किमी खडतर पर्वत आणि बर्फातून त्यांनी प्रवास केला. त्यानंतर धुतूरपूरला मुक्काम करून तिसऱ्या दिवसाची पहाट उजाडली. तेव्हा त्यांनी ६ किमी आणि १८ हजार फुटांपेक्षा जास्त असा बर्फातून प्रवास सुखरूप केला. या प्रवासात अनेकांना उलट्या होणे, चक्कर येणे,ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे सर्वांना गुदमरल्यासारखे होणे हे सर्रास होत होते. तेव्हा आपल्याला आपली पात्रता काय आहे हे कळते आणि अहंकार गळून पडतो, असे महेंद्रशेठ घरत म्हणतात.

या साऱ्या प्रवासात अतिशय अवघड ट्रेक असल्याने जगभरातून पर्यटक येत असतात. प्रवासात जागोजागी श्वास घेतानाही त्रास होतो, हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने कैलास मानसरोवर यात्रा काय आहे, हे त्यांनाही कळते. त्यामुळे पुनर्जन्माचा अनुभव घेऊनच ‘कैलासी’ घरचा रस्ता धरतात. साधारण ५२ किमीचा कैलास मानसरोवरचा हा महाकठीण प्रवास पर्यटकांना दुसऱ्या जन्माचा अनुभव देतो.
दार्चेन ते देरापूक या ट्रेकिंगमध्ये कैलास पर्वताच्या उत्तरेकडील भागाचे नयनरम्य दृश्य दिसते जे यात्रेकरूंसाठी एक पवित्र आणि अविस्मरणीय ठरते.

कैलास परिक्रमेचा सर्वोच्च बिंदू असलेला डोल्मा पास ओलांडताना तर मेंदूला झिणझिण्या येतात. तरीही ट्रेकचा सर्वात कठीण, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रवास करताना महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धीर सोडला नाही. दरम्यान, महारुद्र अभिषेक, जागोजागी आरती करून ते शिवशंकराचरणी लीन झाले होते. गौरी कुंड आणि एक पवित्र तलाव ओलांडून त्यांनी झुथुलपुक येथे प्रवेश केला. झुथुलपुक ते दार्चेन, सागा येथे गाडीने गेले. त्यानंतर दार्चेनला पुन्हा ट्रेकिंग करण्यात आली. त्यामुळे कैलास परिक्रमा पूर्ण केल्याची भावना, तिबेटी लँडस्केप ओलांडून परत येताना सर्व पर्यटकांना कायम राहिली.
याक हा केसाळ प्राणी, मेंढ्या, जंगली गाढव, हजारो जीव-जंतू, पक्षी,चिमण्या या सुद्धा अतिशय थंड वातावरणात राहतात हे ‘याचि देही याचि डोळा’ कैलास मानसरोवर यात्रेनिमित्त पाहता आले, असे महेंद्रशेठ घरत म्हणतात.

‘अष्टपद’ हे जैन धर्मीयांचे अतिशय महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे. ते कैलास पर्वताच्या जवळ आहे. जैन धर्मात अष्टपद हे भगवान ऋषभदेवाच्या (आदिनाथ) मोक्षाचे (मुक्ती) स्थान मानले जाते. त्यामुळे जैन धर्मीय बांधव ही महत्त्वपूर्ण यात्रा करण्यासाठी कैलास मानसरोवरला आवर्जून जातात कारण त्यामुळेच अष्टपदाचे दर्शन होते. महेंद्रशेठ घरत यांनीही हे दर्शन घेतले आणि आपण कैलासी आहोत हे दाखवून दिले.
त्यामुळेच राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्यांमध्ये कैलास मानसरोवर ही महाकठीण यात्रा दुसऱ्यांदा पूर्ण करणारे महेंद्रशेठ घरत हे एकमेवद्वितीय असल्याचे मानले जात आहे. त्यांची गणना सध्या ‘पर्यटनाचा बादशहा’ म्हणून होत आहे.

“दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केल्याने मनस्वी आनंद झाला आहे. २०१८ मध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी सौभाग्यवती सोबत होती तो अनुभव विलक्षण होता. कैलास मानसरोवर यात्रा आपल्याला योग्यता दाखवतो. आपण कुठून आलो, कोठे जाणार, आपण सर्व पशू-पक्षी, जनावरे ही एकाच ईश्वराची लेकरे आहोत. त्यामुळे व्यर्थ अभिमान कशाला? त्यामुळेच यंदा सहकाऱ्यांसोबत शिवशंकराचे आभार मानण्यासाठी दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली त्यामुळे स्वतःला धन्य झाल्याचे समजतो”, अशा भावना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कैलास मानसरोवर यात्रा दुसऱ्यांदा पूर्ण केल्यानंतर व्यक्त केल्या.
