4k समाचार दि. 30
पनवेल(प्रतिनिधी) आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे मत दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथे एका सोहळ्यात व्यक्त केले.

गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा ..सन्मान पनवेलकरांचा या अंतर्गत पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी संपादक संजय आवटे बोलत होते.पनवेलच्या मार्केटयार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,ज्येष्ठ संपादक मधुकर भावे,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे,सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे,कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गुंजाळ,पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी आदी होते. याप्रसंगी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना ज्येष्ठ संपादक मधुकर भावे व लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित आले.

पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे दातृत्व आहे,पण ते दातृत्व कुठल्या ठिकाणी करावे याचे भान त्यांना आहे.जर शाळा चांगल्या नसतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार नाही,रामशेठ ठाकूर तुमच्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर असा नेता आम्हाला हवा आहे.रामशेठ ठाकूर यांचे हे शैक्षणिक आदर्श कार्य महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी घेतले तर महाराष्ट्रात चिंता असणार नाही.वृत्तपत्र चालवणे ही मोठी कठीण गोष्ट आहे.आज पत्रकारिता बदलत चालली आहे.मोबाईलने क्रांती केली आहे,माध्यमे हातात आली असली तरी विचार करायला शिकवत नाही.सर्वसामान्य माणूस हा अत्यंत महत्त्वाचा आहे.हा देश सर्वसामान्यांचा आहे.हा देश तुमचा आणि माझा आहे,त्यामुळे सर्वसामान्य केंद्रबिंदू असला पाहिजे त्यामुळेच आपला विकास होईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी आपल्या भाषणात,वाचणाऱ्यांची संस्कृती आज संपत चालली आहे. लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारा नेता नाही.गरिबांच्या प्रश्नाला कोणी वाली नाही.आवाज उठवणारे वृत्तपत्र नाहीत.लेखणीची ताकद राहिली नाही अशी खंत व्यक्त करून आज संपादक नसताना वृत्तपत्र चालतात. पत्रकार कधी स्वस्त बसत नाही जे तुम्हाला लिहिता येतं ते लिहीत रहा, अशी अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात, समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती,संस्थांचा पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मान पनवेल टाइमतर्फे करण्यात आला ही कौतुकाची गोष्ट आहे.वृत्तपत्रे ही सर्वसामान्यांचा आवाज उठवणारी असावीत,आवश्यक तेथे आक्रमक बातम्या प्रसिद्ध करून सर्वसामान्यांना वृत्तपत्रांनी न्याय दिला पाहिजे.वृत्तपत्रांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. लोकसंख्या वाढीबरोबरच आज त्या ठिकाणी समस्या वाढत आहेत.त्याचं नियोजन झालं पाहिजे.पत्रकारितेतून प्रशासनाचे वृत्तपत्रांनी लक्ष वेधले पाहिजे असे सांगून त्यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिचे भाषण झाल.सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल टाइमचे संपादक गणेश कोळी यांनी केले.वर्धापन दिनानिमित्ताने विकासाचं आंतरराष्ट्रीय शहर-पनवेल.. या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली.पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त, फॅशन शो संचालक देवदत्त घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल सौंदर्यवती (रणवे) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,स्पर्धकांनी मोठ्या प्रतिसाद दिला,त्यांच्या कलेला मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले.
