4k समाचार दि. 4
पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड मधील शिवाजी नगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला. अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली, ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉईज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले. पहिल्या सिझनची ही पहिली मॅच अंडर- प्रकारात खेळवण्यात आली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखविल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर, अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज लोखंडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या क्रिकेट सामन्यांमध्ये शिवाजी नगर क्रिकेट अकॅडमीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर ११० धावांचे लक्ष्य ठेवले होते. अकॅडमीच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. विशेषतः जिज्ञेश कडू याने पाच बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली.

फलंदाजीत कर्णधार शिवम मोकल याने २१ धावा केल्या. शिवम मोकल आणि जिज्ञेश कडू यांच्यासह रुद्र मोकल, हिमांग धोका, हर्ष ठाकूर, पार्थ पाटील, निध्रुव लोखंडे यांनीही संघासाठी मोलाची कामगिरी केली. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झाला असला तरी, आपल्या स्थानिक मुलांनी संयमाचा खेळ खेळला आणि प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला ज्यामुळे सामन्याची चुरस अखेरपर्यंत कायम राहिली. अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज लोखंडे यांच्या विशेष प्रयतांमुळेच न्यूझीलंडच्या संघाला आमंत्रित करणे शक्य झाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळाला.
