4kNews कामोठे 25
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मुंबईच्या कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांनी पटकावले. परिवर्तन, खोपोली संघाने द्वितीय, तर एन. ई. एस. रत्नम महाविद्यालय, भांडुप यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानांतर्गत ‘गुलामगिरी’ या विषयावर ही स्पर्धा पार पडली. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पुणे आणि सांगलीसह महाराष्ट्रातील विविध भागांतून महाविद्यालये व खुले संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आजची ‘Gen Z’ देशाला वेगळी आणि सकारात्मक दिशा देत असल्याचे सांगून तिचे विशेष कौतुक केले. तसेच यावर्षी महाड येथे होणाऱ्या मनुस्मृती दहन आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव उपस्थित होते. “आजच्या तरुणांच्या आंदोलनांतून या देशात बुद्ध, गांधी आणि आंबेडकर यांचे विचार जिवंत असल्याचे दिसते. देशातील अनेक आंदोलनांचे नेतृत्व मुली धाडसाने करत आहेत, ही अत्यंत कौतुकाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
स्पर्धेतील विशेष पारितोषिकांमध्ये नेस वाडिया कॉलेज, पुणे यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सोहन कोरे, आरआयटी विवेकवाहिनी, सांगली यांना उत्कृष्ट लेखक, तर रिया चिले, डी. जी. रुपारेल कॉलेज, मुंबई यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण अक्षय अहिरे, समीर ताभाने आणि वैष्णवी भागवत यांनी केले. कार्यक्रमास महा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव महेंद्र पाटेकर, पनवेल शाखेच्या उपाध्यक्ष रजिया शेख, राज्य पदाधिकारी प्रियांका खेडेकर, अशोक निकम, अल्लाउद्दीन शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

