4kNews कामोठे दि. 25
पनवेल : पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्था आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सिव्हिल हॉस्पिटल रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल बस, व्हॅन चालक, सहकारी तसेच इतर वाहनचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी साईनगर रोड येथील श्री गणेश साई मंदिरात झालेल्या या शिबिराला वाहनचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५० वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एआरटीओ सुरज पवार आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, हेपेटायटिस बी व सी, एचआयव्ही तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. वाहनचालकांचे आरोग्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशीही संबंधित असल्याने नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

शिबिरासाठी महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, अपोलो हॉस्पिटल, आयसीटीसी रुग्णालय कशेळे आणि संबंधित वैद्यकीय पथकांनी सहकार्य केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक लतीफभाई शेख, नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, अॅड. मनोहर सचदेव आणि अॅड. अमोल साखरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सदाशिव हुमणे, सचिव बन्सीलाल देवराम तळेकर, खजिनदार किसन कोंडीबा रौंधळ, कार्याध्यक्ष राजेश हसुराम भगत, सहसचिव अशोक महादेव पोकळे, शरद मारुती घुले तसेच संस्थेच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
वाहनचालकांच्या आरोग्य समस्या वेळीच निदर्शनास याव्यात आणि त्यांच्यात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अशी शिबिरे नियमित घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

