4kNews कामोठे
पनवेल, दि. 25 (वार्ताहर) : जनरेटरसह चोरीला गेलेला टाटा ४०७ टेम्पो अवघ्या काही तासांत शोधून काढत एका संशयिताला ताब्यात घेण्यात पळस्पे महामार्ग पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक केदार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन कुमार कागले यांनी पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राला चोरीच्या टेम्पोची माहिती दिली. एमएच ०४ डीटी ३७८१ क्रमांकाचा सिल्व्हर रंगाचा टाटा ४०७ जनरेटरसह चोरीला गेला असून तो पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक केदार कुंभार यांनी पोलीस हवालदार किरण महाजन व अतुल जगताप यांच्यासह शोधमोहीम सुरू केली. अमेठी पार्किंग परिसरात गस्तीवर असताना संशयास्पदरीत्या उभा असलेला टेम्पो आढळून आला. तपासणी केल्यानंतर तो चोरीचा असल्याचे स्पष्ट झाले.

चालकाची चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव कुंदन कुमार मिश्रा असल्याचे समोर आले. टेम्पो ताब्यात घेऊन संशयिताला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अँटॉप हिल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पळस्पे महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा टेम्पो अल्पावधीत हस्तगत झाल्याने त्यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

