पनवेल, दि. 23(वार्ताहर) : स्त्रीकडे मातेसमान पाहण्याची आणि तिचा आदर करण्याची शिकवण घरातूनच दिली पाहिजे. मुलांमध्ये असे संस्कार रुजवल्यास महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी केले.

शिवसेनेच्या नवरात्रोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, मंदिराच्या पुनर्निर्माणानंतर श्री सदरेच्या माध्यमातून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरू करण्यात आली आहे. उत्सवात लहान मुलांसाठी नृत्य, समूह नृत्य व वेशभूषा स्पर्धा, तर महिलांसाठी पाककला आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. महिलांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांना आनंदाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश असल्याचे साबळे यांनी सांगितले.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता आचरणात आणण्याचे आवाहन केले. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मुलांमध्ये स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार रुजवल्यास समाजात सकारात्मक बदल घडेल आणि स्त्रीशक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

