पनवेल येथे ‘इच्छांचे दीप प्रवाही’ पुस्तकाचे ११ एप्रिल रोजी प्रकाशन


4kNews दि. 10

पनवेल(प्रतिनिधी)  डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दांपत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच ‘डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय’ यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधीर जोगळेकर लिखित ‘इच्छांचे दीप प्रवाही’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहे. 


     या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सेवा, सामाजिक काम, संघटना आणि संस्थात्मक कार्य या विषयांवर ते  मार्गदर्शक आणि प्रेरक विचार व्यक्त करतील. प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल येथील प्रसिद्ध ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद*डॉ. सुहास हळदीपुरकर आणि धूतपापेश्वर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत पुराणिक हे उपस्थित राहणार आहेत.


    इच्छांचे दीप प्रवाही’ हे पुस्तक डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक सेवाकार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारे आहे. या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याची सुरुवात, समाजासाठी केलेले विविध उपक्रम, रुग्णसेवेला दिलेले प्राधान्य, तसेच रुग्णालयाच्या उभारणीपासून विस्तारापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे सुलभ आणि ओघवत्या भाषेत मांडण्यात आले आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत सेवा कार्य कसे उभे राहिले आणि वाढत गेले, याचेही चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक वैद्यकीय, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातील कार्यकर्ते, तरुण पिढी तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


   या कार्यक्रमाचे निमंत्रक रुग्णालय कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती समुद्र आणि कार्यवाह  राजीव समेळ यांनी पनवेल परिसरातील नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णालयातील उपचारांमुळे बरे झालेले रुग्ण तसेच वाचकवर्ग यांनी या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
        डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालय हे रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित सेवा कार्य असून, समाजातील सर्व घटकांना परवडणारी, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य या संस्थेमार्फत  केले जात आहे. आरोग्यसेवेबरोबरच समाजोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम या द्वारेही संस्थेचे कार्य विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा साहित्यिक कार्यक्रमासह समाजकार्य आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणारा आणि पुढील पिढीसाठी प्रेरणा देणारा ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top