4kNews कामोठे
उरण, दि. 15 (विठ्ठल ममताबादे) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण, कृतीआधारित व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन शेवे येथील शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांना सन २०२६-२७ चा ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

महाड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पालकमंत्री भरतशेठ गोगावले, विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
गावंड यांनी पारंपरिक अध्यापनाला नाविन्याची जोड देत कृतीआधारित अध्यापन, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा वापर, अवांतर वाचन आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी कृती व प्रयोगातून शिकावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

डिजिटल युगाची गरज ओळखून त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच DIET पनवेलच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व शैक्षणिक कार्याला राज्यस्तरावर पोहोच मिळाली.

गेल्या तीन वर्षांत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांकडून त्यांना २५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेला ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा त्यांच्या कार्यातील आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे. त्यांच्या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक व हितचिंतकांकडून अभिनंदन होत आहे.

