4k समाचार
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )मावळ – पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत वेळ जातो. त्यासाठी न्हावा शेवा बंदरात रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो) सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची खासदार बारणे यांनी दिल्लीत भेट घेतली. खासदार बारणे म्हणाले,
पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या औद्योगिक पट्ट्यात ११ हून अधिक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन कारखाने आणि ४,००० हून अधिक सहायक युनिट्स आहेत,.

जे ऑटोमोबाईल निर्यातीसाठी महत्त्वाचे आहे. बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोक्सवॅगन, मर्सिडीज-बेंझ, ह्युंदाई, जनरल मोटर्स, फोर्स मोटर्स, पियाजिओ, हिरो मोटोकॉर्प ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आहेत. सध्या, रो-रो सेवा केवळ मुंबई पोर्ट अथॉरिटी (माझगाव/कुलाबा क्षेत्र, दक्षिण मुंबई) मध्ये उपलब्ध आहेत. जिथे दिवसा गंभीर वाहतूक कोंडी आणि नो-एंट्री झोनमुळे प्रवेश प्रतिबंधित आहे. यामुळे केवळ लॉजिस्टिक्स विलंब होत नाही तर निर्यातदारांसाठी वाहतूक खर्चातही मोठी वाढ होते.
