4kNews कामोठे
उरण, दि. ९ (विठ्ठल ममताबादे) : “महेंद्रशेठ घरत हे मनाने सच्चे आणि आश्वासक नेतृत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्यांना योग्य संधी देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

उरण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ८) शेलघर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपकाळ बोलत होते. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळाले असून, त्यांच्या रणनीतीचा पक्षाला फायदा झाल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.
महेंद्रशेठ घरत म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच दुसऱ्यांना संधी देण्यासाठी दोन पावले मागे येण्याची विनोद म्हात्रे यांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

विनोद म्हात्रे यांनी घरत यांच्या कार्याचे कौतुक करताना, “कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाशी बांधिलकी जपण्याचे काम ते करतात,” असे सांगितले.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी ‘सुखकर्ता’वर स्वागत केले. तसेच विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली. कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

